पटक्रीडा अर्थात पटावर खेळायच्या खेळांची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे. पटक्रीडेचे उल्लेख आपल्याला पुरातन साहित्य, मूर्तिकला आणि चित्रकलेतही आढळतात. हरप्पा काळातील कितीतरी ठिकाणाहून उत्खननात प्राप्त झालेले घनाकृती फासे हे या खेळांच्या अस्तित्वाचे पहिले पुरावे म्हणता येतील. आयताकृती फासे आणि कवड्या सुद्धा खेळतांना वापरल्या जात. अगदी मध्ययुगीन काळापर्यंत याचे कितीतरी पुरावे उपलब्ध आहेत. पुरातन लेण्यांच्या, मंदिरांच्या, विशेषतः दक्षिणेतील मंदिरांच्या फरशीवर अशा खेळांचे रेखाटन सापडते. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी असे विविध पट कोरलेले आढळून येतात. मराठवाड्यात किल्ले, मंदिरे, लेण्यात फिरतांना असे अनेक रेखांकने विविध ठिकाणी कोरलेली आढळून आलीत. सुरवातीला नेमके कळाले नाही कि हे काय असावे? असे वाटले कि आता जशी टवाळकी लोक स्मारकाच्या ठिकाणी कोरुन ठेवतात तशी तेव्हाच्या काही मंडळीनी विचित्र काहीतरी कोरलेले असेल किंवा धार्मिक अनुष्ठाना अंतर्गत त्याचे काही वैशिष्ट्य असावे. परंतू नंतर लक्षात आले कि काही एकसारखीच असलेली वैशिष्ट्यपूर्ण रेखांकने विविध ठिकाणी आहेत. शोध सुरु केल्यावर लक्षात आले कि, ही कोरलेली रेखांकने म्हणजे खेळांचे पट आहेत. बहुतांश हेमाडपंथी मंदिरांच्या ठिकाणी दगडी फरशीवर असे पट कोरलेले आहेत. अशाच एका मंदिराच्या फरशीवर कोरलेला मला आढळून आलेल्या एका रणनीतिक पटखेळाविषयी या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहारामधील सकलेश्वर वा बाराखांबी महादेव मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराच्या दगडी फरशीवर एक पट कोरलेला आढळून आला. लहानापासून मोठी होत जाणारी, एकमेकांच्या आत केंद्रित असे कोरलेले तीन चौरस. ज्यामध्ये प्रत्येक चौरसाच्या प्रत्येक बाजूच्या रेषांच्या मध्यबिंदूना एक रेष छेदते आहे. या पटखेळाला ‘नवकंकरी’ म्हणतात, हे खेळाचे संस्कृत नाव आहे. नऊ सोंगट्यानी खेळला जाणारा खेळ म्हणून 'नवकंकरी'असे नाव असावे. मराठीत या खेळाला ‘फरेमरे’ असे म्हणतात. इंग्रजीत यास Nine Men’s Morris, Nine Holes, Nine Mills अशी नावे आहेत. हा खेळ म्हणजे टिक-टॅक-टो या खेळाचेच एक अद्यतनित स्वरुप आहे.
नवकंकरी हा इतिहासातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक असल्याचे मानले जाते. हा एक रेखांच्या आधारे सोंगट्याचे प्रभावी संयोजन करुन खेळावयचा खेळ आहे. जो संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर आढळतो. या खेळाचा सर्वात जुना आराखडा कुर्ना, इजिप्तमधील एका मंदिरात सापडला होता, जो सुमारे १४४० इ.पूर्व काळातील आहे. इतर फलक श्रीलंकेच्या सिलोनमध्ये मिहिनताल टेकडीच्या पायऱ्यांवरती असे दोन पट कोरण्यात आलेले आढळून आले आहेत. सदर पट हे महादाथिका महानागा याच्या कारकीर्दीत (इ.स. पहिले शतक) तयार करण्यात आलेल्या ३० फूट रुंद पायऱ्यांवरती अंकित असून पायऱ्या तयार करणाऱ्या मिस्त्रिंनी ते तयार केले असावे असा अंदाज आहे. या खेळाचा सर्वात जुना लिखित उल्लेख ओव्हिडच्या आर्स अमाटोरिया या आठव्या शतकातील पुस्तकात आहे. नवव्या शतकाच्या (इ.स.८८०) सुमारास नॉर्वेमधील सॅन्डेफजॉर्ड जवळ गोकस्टाड शेतात एक मोठा कबरीचा ढिगारा उत्खननीत करण्यात आला. आत एक वायकिंग जहाज होते आणि जहाजाच्या डेकवर राजाचे दफन कक्ष होते. यामध्ये संपत्ती सोबत या खेळाच्या पटाचे अंकन असलेली भग्न लाकडी फळी प्राप्त झाली. कांस्य-युगीन आयर्लंड, प्राचीन ट्रॉय आणि नैऋत्य युनायटेड स्टेट्समध्ये देखील जमिनीवर कोरण्यात आलेल्या पटाचे पुरावे सापडले आहेत.
तेराव्या/चौदाव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूपच वाढली होती. युरोपियन देशांमध्ये त्याचे प्रचलन खूप होते. खेळाची उत्कृष्ट चित्र उत्तर इटालियन अकादमीच्या कोडेक्समध्ये समाविष्ट आहेत; १३व्या शतकातील 'लिब्रो डे लॉस ज्युगोस' यामध्ये खेळाचे चित्रण आहे. तेराव्या शतकातील अल्फोन्सो एक्स हस्तलिखितात तीन घन फासे वापरून हा खेळ खेळाला जात असल्याचा उल्लेख आहे. रोम येथील व्हिक्टर इमॅन्युएल लायब्ररीतील एका खंडात असलेल्या सिव्हिस बोनोनियाच्या एका रिडक्शनमध्ये गेमचे सचित्र वर्णन असून सामान्य लोकांमध्ये असलेल्या या खेळाच्या लोकप्रियतेचे वर्णन केले आहे. शेक्सपियरने ‘अ मिडसमर नाइट्स ड्रीम’ या आपल्या नाटकामध्ये नाइन मेन्स मॉरिसचा संदर्भ दिला आहे, यामध्ये "नाईन मेन्स मॉरिस चिखलाने भरलेले आहे" असा संवाद असून दुसऱ्या परिच्छेदात “टायटानिया, परींची राणी ओबेरॉनला जगात अराजक निर्माण करण्यासाठी दोष देते. पावसामुळे रोगराई थांबली नाही आणि त्यामुळे नाइन मेन्स मॉरिस पटखेळ खेळू शकत नाही." असा उल्लेख आहे. यावरुन असे लक्षात येते की, हा खेळ घराबाहेर खेळला जात असावा. सदर गोष्टीचा पुरावा म्हणून हा उतारा अनेकदा सांगितला जातो. फ्रान्स आणि जर्मनीच्या मध्ययुगीन साहित्यातही या खेळाचा उल्लेख आहे. हा खेळ वास्तविक जीवनातील सजीव सोंगट्यासहदेखील खेळला गेल्याची नोंद आहे. २४ जून १८९७ रोजी, केशर वाल्डन येथे मुले आणि मुलींना सोंगट्या म्हणून वापरण्यात आले असल्याचा उल्लेख आहे.
या पटाला प्रतीकात्मक महत्वही प्राप्त झालेले होते. श्रीलंकेतील सिलोनमध्ये या पटाची आकृती वाईट प्रवृत्तींपासून संरक्षणाचे प्रतीक म्हणूनही वापरण्यात येत असे. प्राचीन सेल्ट्ससाठी, ‘मॉरिस स्क्वेअर’ पवित्र होता. कौलड्रॉन किंवा मिल म्हणून ओळखला जाणारा मध्यवर्ती चौरस हा पुनर्जन्माचे प्रतीक होता, तर मध्यभागी येणार्या रेषा आणि चौकोन "चार मुख्य दिशा, चार महाभूत घटक आणि चार प्रवाह" यांचे प्रतीक होते.
भारतात हा खेळ कधी आला याचे निश्चित पुरावे नाहीत. मात्र इजिप्त मधून हा खेळ रोम पुढे इटली, फ्रान्स, ब्रिटन करीत संपूर्ण युरोप आणि आशिया खंडात पसरला असावा. आणखी एक शक्यता म्हणजे सातवाहन काळापासून रोम आणि भारताचे व्यापारी संबंध होते. रोमन लोकांचे वास्तव्य इजिप्तमध्येही होते. बर्जरच्या म्हणण्यानुसार हा खेळ, "कदाचित रोमन लोकांद्वारे ओळखला गेला होता", कारण अनेक रोमन इमारतींवर असे पट अंकित आहेत. यावरुन असे शक्य आहे की, रोमन लोकांना व्यापारी मार्गांद्वारे या खेळांची ओळख झाली व नंतर रोमन लोकांमध्ये या खेळाचे प्रचलन इतके वाढले की, त्यांच्या सोबत हा खेळ सर्वदूर पसरला. व सगळीकडे हा खेळ ओळखला व खेळला जाऊ लागला; परंतु हे सिद्ध केले जाऊ शकत नाही. यावरुन असे अनुमान काढता येते कि, इजिप्तमधून हा खेळ रोम मध्ये गेला असावा व रोमवरुन भारतात आला असावा. कारण रोम-भारत प्राचीन व्यापारी मार्गावर असलेल्या विविध शहरांच्या प्रमुख वास्तूंच्या ठिकाणी या पटाच्या खेळाचे अंकन असलेले आढळून आलेले आहे. नाशिकच्या पांडव किंवा त्रीरश्मी लेणी, नाणेघाट येथील लेणी, पितळखोरा, वेरुळ अशा विविध ठिकाणी या खेळाचे पट जमिनीवर कोरण्यात आलेले दिसून येतात.
सदर पट लेण्या वा मंदिराच्या पायऱ्या, कक्षासनाच्या वा भिंतीच्या जवळ असलेली फरशी अशा ठिकाणी कोरलेली दिसून येतात. याचे कारण म्हणजे या ठिकाणी काम करणारे कारागीर किंवा याठिकाणी भेटी देण्यास आलेले व्यापारी किंवा भाविक विश्रांती घेत असतांना फावल्या वेळात हे खेळ खेळत असावेत. त्यावेळी मनोरंजन आणि बौद्धिक कसोटी बघण्यासाठी असे खेळ खेळत असावेत असा तर्क काढला जाऊ शकतो.
हा खेळ खेळला कसा जातो ते पाहूयात,
पट - या खेळाचा पट एकात एक असलेले तीन चौरस आणि त्यावरील ठिपक्यांनी दर्शवलेली २४ घरं यांतून तयार होतो.सोंगट्या - प्रत्येक खेळाडूंकडे नऊ सोंगट्या किंवा खडे असतील.
नियम -
१. फासा टाकून पहिली चाल कोण करणार ते ठरवा.
२. जर तुम्ही सुरुवात केली तर तुमची एक सोंगटी कुठच्याही एका घरात ठेवा.
३. आता समोरच्या खेळाडूने आपली एक सोंगटी त्याला हव्या त्या घरात ठेवायची.
४. सोंगटी फक्त रिकाम्या घरातच ठेवता येते.
५. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सोंगट्या रचून घ्या.
६. सोंगट्या अश्या रीतीने ठेवायचा प्रयत्न करा कि तुमच्या तीन सोंगट्या एका रेषेत सलग येतील. असं झालं तर तुम्ही एक 'घर' तयार करता.
७. जर असं घर तयार केलंत तर प्रतिस्पर्ध्याची कुठलीही एक सोंगटी तुम्ही पटावरून काढू शकाल. ही सोंगटी या डावात पुन्हा वापरता येणार नाही.
८. सगळ्या सोंगट्या मांडून झाल्यावर असं घर तयार करायचा दोन्ही खेळाडूंनी प्रयत्न करा.
९. सोंगटी हलवतांना ती फक्त रेषेने जोडलेल्या ठिपक्यातच हलवता येते हे लक्षात असुदे. थोडक्यात तुम्हाला तिरपी चाल करता येणार नाही.
१०. ज्या सोंगट्यांमुळे एक 'घर' तयार झालं आहे त्यापैकी कुठचीही सोंगटी काढून टाकता येत नाही.
११. मात्र प्रतिस्पर्ध्याला 'घर' बनवण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमचं घर मोडून एखादी सोंगटी हलवू शकता.
१२. एका खेळाडूकडे दोनच सोंगट्या राहीपर्यंत हा खेळ चालेल. अशा वेळी ज्या खेळाडूकडे जास्त सोंगट्या असतील तो जिंकला.
आणखी काही प्रकार - या तीन चौरसांच्या आत आणखी एक चौरस काढून, १२ सोंगट्या घेऊनही हा खेळ खेळता येतो. फक्त दोन चौरस घेऊन, ६ सोंगट्यांनीही हा खेळ खेळता येईल. चित्रात दाखवल्याप्रमाणे फक्त आतल्या चौरसाचे ठिपके जोडून केवळ तीन सोंगट्यांनी सुद्धा हा खेळ खेळता येऊ शकतो. झटपट खेळून होणार हा खेळाचा प्रकार खेळायला उत्तम आणि डोक्याला चालना देणारा आहे.
तर पुढच्यावेळेस मंदिर, लेण्यां वा किल्ले फिरायला गेल्यावर त्यांच्या फरशीवर जर असा पटखेळ कोरलेला आढळून आला, तर नक्की खेळून बघा. तयारीसाठी या खेळाचे अनेक एप Nine men’s Morris किंवा Mills नावाने प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत. तसेच या खेळाचे बोर्डगेम्स विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. नाशिक येथील ‘प्राचीन खेळ संवर्धन मोहीम’ यांच्या संस्थेकडेही हे पटखेळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
संदर्भ : १. Board and Table Games २. प्राचीन भारतीय पटक्रीडा ३. विकिपीडिया



