एकदाची ही सुंदर कलाकृती प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवता
आली. हेलिकल म्हणजे पेचदार वा सर्पिल आकाराची ही बारव लहान जरी असली तरी प्रचंड
आकर्षक आहे. घडवलेल्या दगडांचा वापर मोठ्या खुबीने येथे केलेला दिसून येतो. सदर
बारव द्विस्तरीय असून पहिल्या स्तरावर येण्याकरीता आठ बाजूंनी नऊ पायऱ्या असलेल्या
नागमोडी जिन्यांची रचना आहे. पहिल्या स्तरावर आठ दिशांना आठ देवळ्या आहेत. दुसऱ्या
स्तरावर जाण्यासाठी पुन्हा पहिल्या स्तराप्रमाणेच जवळ्पास चौदा पायऱ्यांची रचना
आहे. बारवे लगतच मध्ययुगीन काळातले एक लहानसे देऊळ आहे. ज्यामध्ये एक अस्पष्ट असा
देवनागरी भाषेतील शिलालेख आहे. ज्याचा वापर फरशीसारखा केलेला आहे. गावकऱ्यांना
त्याचे महत्त्व समजून सांगितल्यानंतर त्याचेही संवर्धन करण्याची गावकऱ्यांनी हमी
दिली आहे. आठ आरे असलेली सुदर्शन चक्राप्रमाणे आकार असणारी ही वृत्त्ताकार बारव
दिसताक्षणीच तुमचे लक्ष वेधून घेते. या बारवेची महाराष्ट्राची एक ओळख ठरावी इतकी
संभाव्यता नक्कीच आहे.
दि. २६ जून २०२२ रोजी सदर भेट दिलेली आणि इच्छा व्यक्त केलेली कि, हि बारव महाराष्ट्राची ओळख ठरू शकेल. यानंतर मी केलेले स्केच महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक असलेले रोहन काळे यांना अतिशय आवडले आणि त्यांनी सदर स्केच 'महाराष्ट्र बारव मोहिम' चा अधिकृत लोगो म्हणून वापरायचे निश्चीत केले. त्यानंतर पाठपुरावा करुन सदर स्केच भारतीय डाक विभागाला पाठवले आणि दि. १८ एप्रिल २०२३ जागतिक वारसा दिना निमित्त सदर स्केच हे भारतीय डाक विभागामार्फत अधिकृतरित्या रद्दीकरणाचा स्टॅम्प म्हणून प्रसिद्ध केले गेले. ही बाब माझ्यासाठी, महाराष्ट्र बारव मोहिमेसाठी आणि एकूणच महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न वारश्यासाठी अभिमानाची बाब आहे.



