प्राचीन काळी मनुष्य समाजाच्या प्रारंभावस्थेत, शिकार करणे हा मानवाच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग होता. प्राण्यांच्या मांसाचा वापर अन्न म्हणून, कातडीचा वापर वस्त्रप्रावरणांसाठी, तर हाडे, खूर, शिंगे इत्यादींचा वापर अणकुचीदार हत्यारे किंवा आभूषणे बनविण्यासाठी करण्यात येई. प्राण्यांची शिकार करणे, ही आदिम जमातींची जीवानावश्यक गरज होती. पुढील काळात अन्न मिळविण्याबरोबरच स्वसंरक्षण, पिकांचे व पाळीव जनावरांचे रक्षण करणे, अशा उद्देशांनीही वन्य प्राण्यांच्या शिकारी करणे माणसाला क्रमप्राप्त ठरले. कालांतराने शेतीचा शोध लागून उपजीविकेची अन्य साधने उपलब्ध झाल्यानंतर शिकारीमागील अन्नसंपादनाचे उद्दिष्ट हळूहळू मागे पडून, त्यातून क्रीडानंद घेण्याची शिकारी प्रवृत्ती वाढू लागली. शिकारीच्या खेळात शिकारी व सावज यांच्यात एकमेकांवर मात करण्याची जीवघेणी चढाओढ असते. त्यामुळे शिकारीच्या खेळाला साहसयुक्त, रोमहर्षक स्वरूप प्राप्त होते. हिंस्र पशूंची शिकार म्हणजे मर्यादित प्रमाणात एक चढाईच असते. शिकाऱ्याजवळ असलेली शस्त्रे, आयुधे ही या चढाईत त्याला उपयोगी पडतात. जनावरांना स्वसंरक्षण करण्याची उपजत बुद्धी व शक्ती असते. आपल्या अंगभूत गुणांनी हे प्राणी काही प्रसंगी शिकाऱ्यावरही मात करतात. शिकाऱ्यांना प्राण्यांच्या सवयींचे, वर्तनविशेषांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. त्यामुळे शिकार करणे हे साहस व शौर्य प्रदर्शित करण्याचे एक साधन म्हणून जनमाणसात रूढ झाले. मानवाच्या विकास क्रमातील काही मूलभूत घटनांच्या प्रभावामुळे शिकारीच्या खेळास उत्तरोत्तर अधिक चालना मिळत गेली.
शिकारीच्या प्रारंभीच्या काळात अणकुचीदार दगड, काठ्या, धनुष्यबाण, कुऱ्हाड, कोयता, भाला यांसारखी शस्त्रे वापरली जात. फुंकनळी वा फुंकबंदुका (ब्लो गन) यांच्या साहाय्याने विषारी टोकाचे भाले प्राण्यांवर फेकण्याचे तंत्र अनेक आदिवासी जमाती वापरतात. बंदुकींचा शोध लागण्याआधी धनुष्य व भाला हे शिकार करण्यासाठी उपयोगात येणारी सर्वात प्रभावी शस्त्र होती. भाल्याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने भोसकून जायबंदी करता येते. भाल्याचा सटीक वार थेट वर्मावर घाव करतो. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही किंवा मग त्यामुळे जीव जातो. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई. प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई. बाण हे भाल्याचेच छोटे स्वरूप होय.
सदर शिल्पात घोडेस्वार वराहसदृश प्राण्याची शिकार करतांना दिसतोय. पूर्वीच्या काळात रानडुकरांची शिकार ही घोड्यावरून भाल्याने करत असत. गावकरी भाला, बरची, कुऱ्हाड वापरतात. घोड्यावरून भाल्याने शिकार करताना घोडा उत्तम सरावाचा असावा लागतो. पाठलाग चालू असताना डुक्कर उलटून शिकाऱ्यावरच मुसंडी मारण्याची भीती असते. रानडुकरांची भरदार मुसंडी बसली तर घोडा देखील आडवा पडेल, इतकी शक्ती त्यामध्ये असते. डुक्कर म्हणजे आर्टिओडॅक्टिला गणातील सुइडी कुलातील सुइस वंशातील हा प्राणी आहे. लठ्ठ शरीर, समखुरी आखूड पाय, जाड कातडे, आखूड राठ केस, सुलभ हालचाल होणारे लांबोळके तोंड, आखूड वळलेले शेपूट असे डुक्कराचे सर्वसाधारण वर्णन करता येईल. रानटी डुकरांचे सुळे बाहेर आलेले असतात. डुक्कर मुंडी खाली घालून जमिनीलगत तोंड घेऊन चालते. डुक्कर हा सर्वभक्षी (शाकाहारी व मांसाहारी) प्राणी आहे. शेतकऱ्यांसाठी रानडुक्कर हा अतिशय उपद्रवी प्राणी आहे त्यामुळे रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार समजली जात असे. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा. प्रदेशाचा राजा रयतेच्या रक्षणार्थ शिकारीच्या मोहिमा राबवत असे. स्वतः छत्रपतीही शिकार मोहिमा काढत असत, तर कित्येकवेळा बक्षीसे लावून डुकरांच्या शिकारी करवून घेतल्या जायच्या. ज्या भागांतून तक्रारी येत त्या भागांमध्ये शिकारीसाठी तळ पडायचे, असे उल्लेख इतिहासात मिळतात. आदिवासी लोकांमध्ये डुकराचे मासं भक्षण केले जाते. त्यासाठीही रानडुकरांची शिकार केली जात असे. भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्रातील राजवल्लभ नावाच्या ग्रंथात डुकराचे मांस वातहारक, बलवर्धक पण बद्धमूत्र करणारे आहे तर राजनिघंटु ग्रंथात ते वीर्यवृद्धी करणारे आहे, असे उल्लेख आहे. यावरून दिसते कि रानडुकरांची शिकार करण्याचे चलन फार पूर्वीपासूनच समाजात अस्तित्वात होते. कुत्रे आणि भाले यांच्या साहाय्याने घोड्यावर बसून डुकराची शिकार करण्याची प्रथा अनेक देशांत होती. भारतात एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सैनिक हा खेळ हौसेने खेळत असत. नंतरही बराच काळ शिकारीचे खेळ खेळले जात असे, परंतु १९७२ साली भारत सरकारने प्राण्यांची शिकार करण्यावर बंदी आणल्याने शिकारींचे प्रमाण हळूहळू कमी झाले आहे.
सदर शिल्पात शिकाऱ्याने आपल्या दोन पायावर उसळलेल्या घोड्यावरुन डुकराच्या वर्मभागाला लक्ष्य करत आपल्या हातातील भाल्याने त्याचा नेमका वेध घेतला आहे. सदरील शिल्प हे रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिराच्या एका स्तंभावर अंकित आहे. सदरील गाव हे भोकरदन तालुक्यात आहे म्हणजे हा भाग कधी काळी भोगवर्धन प्रदेशाच्या अंतर्गत येत असे. त्यामुळे या प्रदेशातही पूर्वी शिकार केल्या जात असाव्यात याची प्रचिती हे शिल्प देत आहे. कारण मंदिरांवर तसेच लेणी इतर भौतिक दृश्य कलाकृतींवर स्थळ व काळ परत्वे संस्कृतीचा प्रभाव अवश्य दिसत असतो. तसेही प्राण्याची शिकार करणारी शिल्पे अनेक मंदिरांवर इतरत्रही दिसून येतात.
संदर्भ : १.मराठी विश्वकोश

