आज २१ जून म्हणजे जागतिक योगदिन. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. योगाचे महत्त्व हिंदु, बौद्ध व जैन या तिन्ही धर्मांमध्येही स्पष्ट केलेले आहे. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली आणि त्याचे महत्त्व जाणून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला आहे.
प्राचीन काळापासून योगाच्या मुख्यत: दोन परंपरा अस्तित्वात आहेत. एक साधनेची परंपरा आणि दुसरी शास्त्राची परंपरा. योगामधील आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध, ध्यान इत्यादी विविध साधना स्वत:हून करता येत नाहीत, तर त्या एखाद्या गुरूंकडून शिकल्यावरच करता येतात. या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने आजपर्यंत शिकविल्या-शिकल्या गेल्या आहेत. ही साधनेची परंपरा होय. ज्या ज्या योग्यांनी साधना केली, त्या सर्वांनीच त्यांचे अनुभव ग्रंथरूपात शब्दबद्ध केले, असे नाही. ज्या योग्यांनी ग्रंथांची रचना केली, त्यानुसार शास्त्राची एक परंपराही प्रचलित झाली. या शास्त्रीय परंपरेलाच ‘योग दर्शन’ असे म्हटले जाते. या शास्त्राच्या परंपरेचे, योग दर्शनाचे प्रवर्तक पतंजलि ऋषि मानले जातात. त्यांचा काळ सुमारे इ. स. पूर्व दुसरे शतक मानला जातो. खरे तर योगाच्या साधनेची आणि ग्रंथरचना करण्याची समृद्ध परंपरा पतंजलींच्या आधीही अस्तित्वात होती, परंतु त्यांच्या आधीचा कोणताही ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे ही निर्दोष, विद्वत्तापूर्ण आणि योगाच्या सर्व आयामांचे वर्णन करणारी असल्यामुळे पतंजलि हेच योगाचे प्रवर्तक आहेत असे मानले जाते. ‘अथ योगानुशासनम्’ या पहिल्याच सूत्रामध्ये पतंजलींनी ‘अनु’ (नंतर) हा उपसर्ग वापरून सूचित केले आहे की, योगावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ नसून आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या योगशास्त्राच्या परंपरेचे ते अनुसरण करीत आहेत. ‘अनु’ या उपसर्गाचा अर्थ अनुसरण करणे.
इंद्रियांचा संयम करून मन एकाग्र करणे म्हणजे योग होय. कठोपनिषद व श्वेताश्वतर-उपनिषद या प्राचीन उपनिषदांमध्ये वरील अर्थी योग शब्द वापरला आहे. संस्कृतमधील ‘युज्’ धातूपासून ‘योग’ हा शब्द बनला आहे. गाडीला किंवा रथाला घोडा वा बैल हे वाहन जुंपतात. जुंपणे म्हणजे योग. इंद्रियांना घोड्यांची व शरीराला रथाची उपमा कठोपनिषदात दिली आहे. इंद्रियांना जुंपून व ताब्यात ठेवून विष्णुपदापर्यंत पोचता येते असे येथे म्हटले आहे. भारतीय शिल्पकलेतही योगाचे महत्त्व विविध स्वरुपात रेखित केले आहे. देवतांच्या योग किंवा ध्यान स्वरूपातील मूर्ती आपल्याला हिंदु, बौद्ध व जैन या तिन्ही योग धर्मात पहावयास मिळतात. शिव आणि विष्णूच्या योगमूर्ती, ध्यानीबुद्ध, ध्यानमग्न जीन तीर्थंकरांची शिल्पे याशिवाय साधक व योगी ध्यान किंवा योग साधना किंवा योगासने करतांनाचे अंकन बहुतांश मंदिरांवर आढळून येते. हम्पी येथील असलेले योग नरसिंहाचे शिल्प जगप्रसिद्ध आहे.
भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. भारतीय षड्दर्शनांपैकी पतंजलिप्रणीत योगदर्शन उपलब्ध आहे. त्यात चित्तवृत्तींचा म्हणजे मनोवृत्तींचा निरोध म्हणजे योग होय, अशी व्याख्या दिली आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, हठयोग, लययोग, मंत्रयोग असे अनेक योगमार्ग अध्यात्मविद्येत सांगितलेले आहेत. त्या सर्वांमध्ये चित्ताची एकाग्रता हा योगाचा अर्थ गृहीत धरलेलाच असतो. कोणतेच महत्त्वाचे कार्य चित्ताच्या एकाग्रतेशिवाय साध्य होऊ शकत नाही. मनाच्या संपूर्ण एकाग्रतेस समाधी असे म्हणतात. भगवदगीतेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग अशा योगाच्या निरनिराळ्या प्रक्रिया वर्णिलेल्या आहेत. कर्मांचे कौशल योग होय किंवा सुखदुःखादी द्वंद्वांची समता म्हणजे योग होय, अशा योग शब्दाच्या दोन व्याख्या भगवदगीतेत सांगितल्या आहेत. जीवात्मा आणि परमात्मा यांचा आनंदमय संयोग साक्षात्काराने, भक्तीने वा ध्यानाने घडून येतो. यासही योग असे उपनिषदे म्हणतात. पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना आणि त्याद्वारे साधता येणारी आध्यात्मिक उन्नती याबाबत आपल्या योगसूत्र ग्रंथात विस्तृत विवेचन केलेले आहे.
शिल्पकलेमध्ये योग अंकित करतांना सहसा खालील तीन बाबींचा प्रामुख्याने उपयोग केल्या जातो.
मुद्रा : योगसाधना करतांना विविध मुद्रांचा उपयोग केल्या जातो परंतु प्रामुख्याने जि मुद्रा दर्शविली जाते ती म्हणजे ध्यानमुद्रा. आपले दोन्ही हात मांडीवर एकमेकांवर ऊर्ध्व (तळहात आकाशाच्या दिशेने) ठेऊन तयार होणारी मुद्रा म्हणजे ध्यानमुद्रा. शिव, विष्णु, जैन तीर्थंकर, बुद्ध यांचे ध्यान करतांनाचे शिल्प सहसा याच मुद्रेत अंकित असते.
योगपट्ट : योगपट्ट म्हणजे असे वस्त्र जे शरीराभोवती गुंडाळून योगसाधना करण्यासाठी उपयोगात आणले जाते. इतिहासामध्ये योगसाधना करतांना योगपट्टास खूप महत्व दिले गेले आहे. साधना करतांना आसन, स्थिरता, सहजता आणि चैतन्य येण्यासाठी व त्याद्वारे संपूर्ण शरीरात आत्मिक उर्जेचे वहन होण्यासाठी योगपट्ट उपयोगात आणला जात असे.
योगपट्टासन : उत्कुटितासनात बसलेला जेव्हा दोन्ही गुडघे योगपट्टाने बद्ध करतो तेव्हा हे आसन होते. लकुलीश याच्या काही मूर्ती याच आसनात दिसतात. हळेबीड येथील नरसिंहाची प्रतिमा याच आसनात आहे. भरहूतच्या वेदिका शिल्पातही या आसनाचे अंकन आढळते. येथेच भारद्वाज ऋषीस या आसनात बसलेले अंकन आहे. मथुरा येथून प्राप्त एका अंकनात तीन पंक्तीत बसलेल्या काही व्यक्ती याच आसनात दाखवल्या आहेत.
योगसाधना करण्याच्या दृष्टीने भारतीय कलेत प्रामुख्याने शिल्प स्वरुपात योगपट्ट घालून योगपट्टासनात साधना करणारे देवी-देवता व मुनी आणि साधकांचे शिल्पांकन प्रचुर प्रमाणत केल्याचे दिसून येते. अशाच स्वरूपाचे एक शिल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या तालुकास्थानापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या माणकेश्वर गावामध्ये महादेवाचे चालुक्यकालीन मंदिर आहे. ज्यास ‘माणकेश्वर मंदिर’ म्हणले जाते यावरूनच गावाचे नाव पडले आहे. माणकेश्वर मंदिराच्या सभामंडपातील रंगशिळेभोवती चार अप्रतिम कलाकुसर असलेले स्तंभ आहेत. यापैकी गर्भगृहानजीक दक्षिण दिशेस (डाव्या बाजूस) असलेल्या स्तंभावर प्रस्तुत शिल्पाचे अंकन आहे. स्तंभाच्या पश्चिमबाजूस स्तंभपादाच्या ठिकाणी जवळपास तळहाताच्या आकारा एवढे म्हणजे 14 x 7 से.मी. इतके आकारमान असलेला नंदी अंकित आहे. नंदी वृषमुख असून देह मानवी स्वरुपात दाखवलेला आहे. नंदी चतुर्भुज दर्शविलेला असून योगपट्टासनामध्ये म्हणजे दोन्ही पाय छातीपर्यंत घुडग्यातून दुमडलेले असून शरीराभोवती योगपट्ट गुंडाळलेले असे स्वरुप आहे. मुख्य दोन्ही हात हे ध्यानमुद्रेत मांडीवर ठेवलेले असून मागील हातांमध्ये अंकुश व त्रिशूल सदृश आयुधे आहेत. शिल्पाचे आकारमान लहान असल्याने गळ्यामध्ये ग्रीव्हा व हातांमध्ये कंकण एवढेच अलंकरण असलेले दिसून येते.
नंदीचे शिल्पांकन अशा स्वरुपात करण्याचे काय प्रयोजन असावे? यासाठी नंदीचा संबध योगशास्त्रासोबत कसा येतो ते पहावे लागेल. शैव पंथाचाच एक भाग आहे नंदीनाथ संप्रदाय. हा संप्रदाय प्रामुख्याने योगसाधना आणि योग अभ्यासाला महत्त्व देतो. नंदीनाथ संप्रदाय व्यापक नाथ संप्रदायाशी संबधित आहे. नंदीनाथ संप्रदायाची सुरवात किमान इ.स.पू. 200 पर्यंत होते. त्याचे संस्थापक आणि प्रथम ज्ञात अध्यात्मिक गुरू महर्षि नंदीनाथ होते. ज्यांना नंदिचेच रुप मानले जाते. नंदीनाथांचे आठ शिष्य होते. सनतकुमार, सनकर, सनदानर, सनथानर, शिवयोगमुनी, पतंजली, व्याघ्रपद आणि तिरुम्युलर. यापैकी पुढे पतंजलीने योगसूत्रांच्या लेखन केले. हा महत्त्वपूर्ण मजकूर योगाच्या अभ्यासावरील सर्वात मोठ्या प्रमाणात उद्धृत केलेला आणि आदरणीय ग्रंथ ठरला. पतंजली हे महर्षी नंदिनाथांचे शिष्य जे नंदीचा अवतार मानले गेले आणि नंदीने हे ज्ञान शिवापासून प्राप्त केले अशी एक धारणा आहे. शिवापासुनच योगाची निर्मिती झाली म्हणून शिवाला आदियोगी असे देखील म्हणतात.
एकंदरीत नंदीचा योगशास्त्रासोबत असलेला संबध पाहता माणकेश्वर येथे असलेल्या शिल्पाला योगनंदी म्हणणे समर्पक वाटते. आणि अशा स्वरूपाचे योगनंदीचे शिल्पांकन इतरत्र असल्याचे अद्यापपर्यत निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे माणकेश्वर येथील योगनंदी दुर्मिळच म्हणावा लागेल.
संदर्भ : १.मराठी विश्वकोश २. भारतीय मूर्तिशास्त्र – प्रदीप म्हैसेकर ३. Dancing with Siva

