कलशास कुंभ किंवा घट असे देखील म्हणतात. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत कलश किंवा घट यास खूप महत्वाचे मानले गेले आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवातही कलश स्थापनेने केली जाते. गुडीपाडवा, नवरात्री, संक्रांती इ. सणांना तसेच विविध यज्ञ करतांना प्रतिकात्मक स्वरुपात कलश पूजन केल्या जाते.
![]() |
| घटपल्लव, कैलाश मंदिर, वेरुळ व सुरसुंदरी जया, निलकंठेश्वर मंदिर, निलंगा |
कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित:।
मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता:।।
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा।
ऋग्वेदोअथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथवर्ण:।
अंगैच्श सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिता:।।
कलशाच्या मुखस्थानी विष्णु, कंठस्थानी रुद्र, मूळस्थानी ब्रम्ह, मध्यभागी सर्व देवीदेवता व अंतर्भागात सागर, सर्व सप्तद्वीपे, वसुंधरा (पृथ्वी) आणि चार वेद सामावलेले आहेत. कुंभ हे आत्म-जागृतीचे प्रतीक आहे; उर्जेचा स्रोत आहे. तो मानवतेचा असीम प्रवाह असून निसर्ग आणि मानवतेचा संगम आहे. संस्कृतमध्ये कुंभ शब्दाचा अर्थ मानवी शरीर असा देखील होतो. शरीर रुपी घटात जीवनामृत, आत्मा, पाणी हे सामावलेले आहेत.
ऋग्वेद, अथर्ववेद, मस्त्यपुराण इ. ग्रंथामध्ये कलशासंबधी विविध वर्णने आढळतात. पूर्ण कलशास मांगल्याचे प्रतिक समजले जाते. यासोबतच कलश हे सृजन आणि मातृत्वाचेही प्रतिक आहे. हरप्पा आणि मोहेंजोदारो येथे घटसदृश पोट असलेल्या मातृमुर्ती सापडल्या आहेत. तसेच घटाच्या शीर्षस्थानावर स्त्रीमुख किंवा कमळ असलेले शिल्पही प्राप्त झाले आहेत. वाल्मिकी रामायणातही घटामधून जीव निर्मिती झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे कमळ व लतायुक्त घट हा गर्भिणी स्त्रीचे द्योतक आहे ही धारणा सर्वमान्य होऊन कुंभ हे जीवन व फलवत्तेचे देखील प्रतिक म्हणून मान्य झाले.
यामुळेच भारतीय कलेत कलशाचे प्रतिक विविध ठिकाणी आढळून येते. मंदिरांवर तसेच शिल्पांमध्येही आयुध म्हणून कलशाचे अंकन असलेले दिसून येते. कलशाचे सर्वप्रथम अंकन हे शुंग काळात भरहूत येथे आढळून येते. कलशाचा समावेश अष्टमांगलिक प्रतिकांमध्येही होतो. जैनस्तूपात आयागपट्टाचे अंकन आहे तेथे कलशाचेही अंकन आढळते. दक्षिण भारतात पल्लव, राष्ट्रकुट, चालुक्य यांच्या काळात पल्लवयुक्त घटाचे अंकन मंदिर व शिल्पांमध्ये प्रामुख्याने आढळून येते. मंदिराच्या शीर्षस्थानी पूर्ण कलशाचे अंकन असलेले दिसून येते. पूर्ण कलशातून लता पल्लव व पुष्प बाहेर येत असलेल्या स्वरूपाचे अंकन विविध ठिकाणी असल्याचे दिसते. तसेच स्तंभ व भित्तींवरही कलशाचे अंकन दिसून येते. काही मंदिरांच्या द्वारशाखेमध्येही कलशाची स्वतंत्र शाखा कोरलेली दिसून येते. गजलक्ष्मीच्या शिल्पात, गंगा यमुना सरस्वती यांच्या शिल्पात तसेच साधक व साधिका पूजेसाठी जल नेत असलेल्या स्वरुपात कलशाचे अंकन आहे. सोबतच सर्व मुख्य देवीदेवतांच्या कमंडलू स्वरुपात एका प्रकारे कलशाचे एक प्रमुख आयुध म्हणून अंकन असते. अशाप्रकारे कलश हे मांगल्याचे, सृजनतेचे प्रतिक म्हणून भारतीय कला व स्थापत्यात विविध स्वरुपात आपल्याला आढळते.
संदर्भ : १. भारतकोश २. भारतीय मुर्तीशास्त्र – प्रदीप म्हैसेकर ३. पूर्ण कलश – पृथ्वी कुमार अग्रवाल

