२२ एप्रिल म्हणजे जागतिक वसुंधरा दिन. जगातील पर्यावरण कार्यक्रमांना प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी व लोकांना आपल्या पृथ्वी व तिच्या संरक्षणासाठी जागरूक करण्यासाठी विश्वभर साजरा केला जातो. संपूर्ण विश्वभराप्रमाणे भारतीय ऐतिहासिक ग्रंथांमध्येही पृथ्वी संदर्भात विस्तृत लेखन असलेले दिसते. भारतीय संस्कृतीत पृथ्वीला मातेचा दर्जा आहे. मुर्तीशास्त्रामध्येही पृथ्वीचे भूदेवी म्हणून अंकन असलेले दिसून येते. आज त्याविषयीच आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
माता भूमिः पुत्रो अहं पृथिव्याः
अर्थ : पृथ्वी माझी आई आहे. मी तिचे मूल आहे. (अथर्व वेद १२.१.१२)
भूदेवी ही म्हणजे पृथ्वी. तिच्यापासून सर्व जीवांची उत्त्पती झाली आहे. तिच्यावर वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक जीवाची ती आई आहे. हिंदु धर्म पर्यावरणीय दृष्टिकोनासाठी आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाची साधने प्रदान करतो जो देवत्व आणि मातृ निसर्गाच्या अविभाज्य स्वरूपाची ओळख आणि उपासना करतो. सृजनाची देवी म्हणून भूदेवी ओळखली जाते. भूदेवी सहनशीलता, करुणा आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. शांखायन आरण्यकात पृथ्वीला ‘वसुमति’ म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हटले आहे. उत्क्रांतीच्या प्रवासात ती सर्व जीवांचा भार तोलून धरते. आपल्या कृतींचा परिणाम, वैयक्तिक आणि सामूहिक दोन्हीस्वरुपात आपल्या आईवर (पृथ्वीवर) जास्त प्रमाणात असते. या कारणास्तव जेव्हा आपण उठतो तेव्हा भूमीला स्पर्श करुन तिची क्षमा मागतो,
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
अर्थ : समुद्रवस्त्र परिधान करणारी, पर्वतरुपी स्तन असलेली, विष्णूची पत्नी असलेली भूदेवी मी तुला नमस्कार करतो. मी पायाने तुझ्या शरीरास स्पर्श करतो म्हणून मला क्षमा कर.
भारतीय परंपरेनुसार पृथ्वी पंचमहाभूतांपैकी एक असून प्रथ् (विस्तार पावणे) या धातूवरून पृथ्वी (विस्तार पावणारी) हा शब्द आला आहे. भूदेवीचे वर्णन वराह पुराणात सापडते. ती कश्यप प्रजापतीची मुलगी आहे. म्हणून तिला कश्यपी या नावाने देखील ओळखले जाते. हिरण्याक्ष दैत्याने जेव्हा भूदेवीचे अपहरण केले व समुद्रामध्ये तिला लपवून ठेवले तेव्हा विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षचा वध करून स्वतःच्या दंतावर पृथ्वीला उचलून समुद्राबाहेर आणले. श्रीमद् भागवतच्या मते, भूदेवी नरकासुरा किंवा नरक राक्षसांची आई आहेत. लक्ष्मीच्या दोन रूपांपैकी एक म्हणून भूदेवीचेही वर्णन केले गेले आहे. देवीचे अन्य रुप म्हणजे श्रीदेवी. भुदेवीस देवी लक्ष्मीचे प्रजनन स्वरूप म्हणून देखील पाहिले जाते.
काही मान्यतेनुसार, भगवान विष्णूने जेव्हा कृष्ण अवतार घेतला तेव्हा भगवान कृष्णाची पत्नी सत्यभामा म्हणून भूदेवीने विष्णूसमवेत अवतार घेतला. उत्तरा कांडानुसार, रामायणचा अंतिम भागातील प्रसंगानुसार, भूदेवी ही सीतेची आई आहे. अग्नी परिक्षेनंतर सीता जेव्हा पती श्रीरामाला सोडून जाते तेव्हा भूमी उघडून देवी तिला आपल्यासोबत घेऊन गेल्याचे वर्णन आहे.
विष्णूची शक्ती म्हणून भूदेवी हिला मान आहे. हिची शिल्पांकने दोन प्रकाराने केलेली आढळतात:
(१) वराहासमवेत (२) विष्णूसमवेत.
पुन्हा, वराहासमवेत ती असते तेव्हाही दोन प्रकारे तिची अंकने केलेली असतात.
(१) वराह अवतारात हिला समुद्रातून विष्णूने वर काढल्याची कथा सर्व- परिचित आहे. वराह जेव्हा प्राणिअवस्थेत दाखवितात तेव्हा ती त्याच्या तोंडासमोर लोंबकळती दाखवितात. वराह या वेळी सामान्यत: 'यज्ञवराह' रूपात असतो. अशी शिल्पांकने रामटेक (जि.नागपूर), महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी आढळतात.
(२) वराह जेव्हा अर्धमानवी रूपात शिल्पित केलेला असतो तेव्हा तो चतुर्भुज असतो आणि त्याने डाव्या खालच्या हातावर तिला धरलेले असते, तसेच वरच्या हाताचाही तिला आधार दिलेला असतो आणि द्विभुज पृथ्वी/भूदेवीने एका हाताने त्याच्या सुळ्याचा आधार घेतलेला असतो. कधी ती बसलेली तर बहुधा उभीच असते. भारतीय शिल्पींनी धिप्पाड बांधेसूद देहाचा वराह आणि विविध विभ्रमांतील भूदेवी यांच्या फार लोभसवाण्या प्रतिमा शिल्पसृष्टीला दिलेल्या आहेत. उदयगिरी लेणे (विदिशाजवळ), वेरूळ येथील क्र. १४,१५,१६ इत्यादी लेण्यांत अशी शिल्पे आढळतात.
दुसऱ्या प्रकारात भूदेवी विष्णू व लक्ष्मीसह बसलेली दिसते. अशी एक प्रतिमा वेरूळ येथील लेणे क्र.१४ मध्ये एका भव्य शिल्पपटात आढळते. येथे तिघेही अर्धपर्यंकासनात बसलेले आहेत. विष्णू चतुर्भुज असून या दोघी द्विभुज आहेत. यांच्या मागे दोन दोन सेविका आहेत. शास्त्रानुसार भूदेवी एकटी कधीही विष्णुसमवेत नसते. लक्ष्मी विष्णूजवळ असेल तेव्हाच भूदेवीही त्याचेजवळ असते. बहुतेक ग्रंथांतून हिला द्विभुज दाखवावे असेच आहे आणि ती कमल (उत्पल) धारी असावी, विष्णुधर्मोत्तरात मात्र (अध्याय ६१,६५ इ.) हिला चतुर्भुज दाखवले आहे. त्या हातांत रत्नपात्र, धान्यपात्र, औषधीपात्र व कमळ सांगितले आहे. मात्र तिचे असे शिल्पांकन कोठेही आढळत नाही.
संदर्भ : १. T.A.Gopinath Rao - Elements of Hindu Iconography २. विष्णुमूर्तये नमस्तुभ्यं – डॉ. गो. ब. देगलूरकर ३. मराठी विश्वकोश

