२९ एप्रिल, हा जागतिक नृत्य दिन म्हणून संपूर्ण विश्वभरात साजरा केला जातो.
नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।
नृत्य हा अवकाशातला आकृतिबंध आहे आणि वास्तू, चित्र व शिल्प या कलांप्रमाणे अवकाशबद्ध लय त्यात साधली जाते. त्याचबरोबर संगीताप्रमाणे त्यात कालात्म लयरचनाही केली जाते. श्राव्य व दृश्य अशा दोन्ही अंगांची लय साधणारी नृत्य ही एकमेव कला होय, असे म्हणता येईल.
नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे.
नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. शिवाशी संबंध जोडल्यामुळे नृत्यकलेला एक प्रकारचे पावित्र्य व प्रतिष्ठा प्राप्त झाली. शिवाय नटराजाच्या प्रतीकात्मकतेमुळे नृत्य, शिल्प, नाट्य, साहित्य व मूर्तिकला अनुप्राणित झाल्या आहेत. शिवाची जी विविध रूपे आहेत, त्यांपैकी नर्तकरूपातील अथवा नृत्तमूर्ती' च्या रूपातील शिवाला नटराज असे म्हणतात. 'नट्' (नृत्य करणे) या संस्कृत धातूपासून 'नट' (नर्तक) हा शब्द बनला असून, नटराज म्हणजे नटांचा (नर्तकांचा) राजा होय. तो विविध मार्गांनी नृत्याशी निगडित असल्यामुळे त्याचे हे नाव सार्थ ठरते. त्याला नटेश, नटेश्वर, नटशिखामणी व नर्तेश्वर (नृत्येश्वर) असेही म्हटले जाते. शिवाच्या अर्धनारीनटेश्वर या नावात 'नटेश्वर' हा शब्द आहे. नटराजाच्या उजव्या कानात पुरुषाचे तसेचे डाव्या कानात स्त्रीचे कर्णभूषण असते, यांवरून अर्धनारीनटेश्वर हेही नटराजाचेच एक रूप असल्याचे स्पष्ट होते. नटराज हा आद्य नर्तक, नृत्याची अधिष्ठात्री देवता, नृत्यकलेचा प्रवर्तक, आद्य नृत्याचार्य आणि स्वतःच्या नृत्याचा प्रेक्षकही असतो. ब्रह्मांड हीच त्याची नृत्यशाला असते.
नृत्यप्रिय असलेला शिव बाणासुरासारख्या भक्तांच्या नृत्यांनी संतुष्ट होतो आणि स्वतःही सात्त्विक नृत्यांपासून ते तामसिक स्मशाननृत्यांपर्यंत विविध नृत्ये करतो. शैवागमातील माहितीनुसार त्याने १०८ प्रकारांची नृत्ये केली होती. शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याचजोडीने संगीत शास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते. नटराज शिवाने केलेल्या तांडवातून सृष्टीची चक्राकार रचना आणि विनाश या दोन्हीचा आशय व्यक्त होतो असे मानले जाते. पार्वतीचे लास्य नृत्य आणि शिवाचे रौद्र तांडव हे प्रकृती आणि परमात्मा यांच्या लीलांचे प्रतीक मानले जाते.
नटराजच्या नृत्यामागील प्रतीकात्मक अर्थही भिन्नभिन्न पद्धतींनी स्पष्ट केले जातात. नटराजाचा उजवा पाय हा विश्वनिर्मिती व्हावी म्हणून जीवांना मायेच्या बंधनात टाकतो;तर उचललेला पाय भक्तांना मोक्ष देतो. विश्वनिर्मितीच्या वेळी पहिल्यांदा शब्द बनत असल्यामुळे डमरू हे निर्मितीचे प्रतीक, तर अग्नी हे प्रलयंकर तत्त्व असल्यामुळे नाशाचे प्रतीक होय. अशा रीतीने पायांच्या स्थितींमधून बंध व मोक्ष आणि हातांच्या स्थितींमधून निर्मिती व नाश या मूलभूत अवस्थांतील समतोल साधलेला आहे. प्रभामंडळ हे प्रकृतीच्या नृत्याचे प्रतीक आहे. या नृत्यातून विश्वाची जिवंत क्रियाशीलता सूचित होते. त्या प्रभामंडळात प्रकृतीला प्रेरणा देणाऱ्या आद्यप्रेरकाचे नृत्य चालू असते. ही प्रतीके पुढील पद्धतीने ही सांगितली जातात. टेकलेला पाय हा कर्मबंधात अडकलेल्या जीवांना आधार देणारा आहे, डमरूतून शब्दशास्त्र जन्मते, अग्नी चराचराची शुद्धी व इष्ट परिवर्तन करतो, अभयमुद्रेतील हात संरक्षण देतो, झुकलेला हात मोक्ष देणाऱ्या पायाकडे निर्देश करतो, अपस्मार हा अविद्येचे प्रतीक आहे, प्रभावळ हे मायाचक्र आहे, शिव पायाच्या व हाताच्या स्पर्शाने ते प्रवर्तित करतो आणि मग माया पंचभूतांच्या रूपाने प्रकट होते, ज्वालांकुरातील ५ स्फुल्लिंग हे पंचभूतांचे द्योतक आहेत इ. स्पष्टीकरणे आढळतात. समग्रमूर्ती हे ॐ रूपी सत्याचे प्रतीक आहे, असेही मानतात. नृत्यमूर्ती आणि ॐ हे अक्षर यांच्या रचनेतही साम्य दर्शविले जाते. 'नमः शिवाय' या पाच अक्षरांशीही या नृत्याचा गूढ संबंध जोडला जातो. उदा., पायात 'न', नाभीत 'म', खांद्यात 'शि' चेहऱ्यात 'वा' आणि मस्तकात 'य' अक्षरे आहे, अशा प्रकारची अनेक स्पष्टीकरणे आढळतात.
नटराजाचे नृत्य हा ईश्वराच्या आदिशक्तीचा लयबद्ध आविष्कार आहे आणि ते विश्वातील नियमबद्ध हालचालींचे प्रतीक आहे, ही या नृत्यामागची मूळ कल्पना आहे. रॉमँ रॉलांने या प्रतीकात जीवनातील सर्व शक्तींचे सर्वश्रेष्ठ संश्लेषण झाल्याचे म्हटले आहे. हे नृत्य ईश्वराच्या सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव (आवरण, भ्रांती व विश्रांती) आणि अनुग्रह (कृपा व मोक्ष) या पंचक्रियांचे प्रतीक मानले जाते. डमरू हे सृष्टीचे, अभयमुद्रा हे स्थितीचे, अग्नी हे नाशाचे, प्रभामंडळ हे तिरोभावाचे व उचललेला पाय हे अनुग्रहाचे प्रतीक होय. शिव आपले सामर्थ्य जड व चेतन सृष्टीमध्ये नृत्याद्वारे संक्रमित करून त्यांनाही नृत्य करावयास लावतो. त्याने नृत्य सुरू केल्याखेरीज प्रकृती नृत्य करीत नाही व त्याचे नृत्य सुरू होताच तीही नाचू लागते. त्रिभुवन हा त्याचा आंगिक अभिनय. सर्व वाङ्मय हा त्याचा वाचिक अभिनय आणि चंद्रतारादी हे त्याचा आहार्य अभिनव होत. नृत्य ही त्याची एक लीला आहे. त्याचे नृत्य पाहणाराला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. तो केवळ अंतिम सत्याचेच प्रतीक नाही, तर अनुग्रह करीत असल्यामुळे प्रेमाचेही प्रतीक आहे. नृत्य थांबले, की सगळे विश्व स्वतःत सामावून तो एकटाच आत्मानंदात राहतो.
नर्तन मानवी मनाची उदात्त अभिव्यक्ती आहे. अंग उपांगा सह ही साधना म्हणजे एक परम सोहळाच.! दंडी लिखित दशकुमारचरितम मधील कंदुकावतीच्या नृत्याच्या वर्णन असे,
भंगे भंगे मुख कुर्याद्धस्तो दृष्टीं च नर्तन ।
हस्तकाद्यं भवेल्लोके कर्मणोभिनयेखिलम्।।
प्रतिमाशास्त्रात शिल्पामध्ये शिव, गणेश, सप्तमातृका यांच्या प्रतिमा प्रसंगानुरूप नृत्यरत असाव्यात असे वर्णन आढळते , मंदिराच्या मंडोवरावर नृत्यथर पण शिल्पित करण्याबाबत विधान आहे, नृत्य शृंगारासोबत आराधना म्हणून ही केले जाते त्यामुळेच रंग मंडपाचे आयोजन मंदिरात आहे
नृत्य हा केवळ भारतीय शब्द नसून वैश्विक साहित्याच्या शृंखलेतही खूप प्राचीन आहे. नृत्याचा विशेष प्रयोग वैदिक साहित्यात आपल्याला बघायला मिळतो. अशी ही भगवान शंकरांपासून उगम पावलेली ही नृत्यकला विकासाची विविध वळणे पार करून इथवर येऊन पोहोचली आहे. तिचा प्रवास असाच चालू राहील आणि मानवाला आनंद देण्याचे काम ही कला सदैव करत राहील.

