सर्वांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना असतेच. या भावनेचा आदर संपूर्ण जगामध्ये केला जातो. मानवी जीवनात आईचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आईसारखे कुणीच नसते. महाभारतातही असा उल्लेख आहे.
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति: ।
नास्ति मातृसमं त्राण नास्ति मातृसमा प्रिया ॥ (महाभारत xii. २६६.३१)
शक्ती उपासनेचा इतिहास हा जवळपास मानवाच्या इतिहासाइतकाच प्राचीन आहे. जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. याचे कारण मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व. स्त्री मातेच्या रुपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही गोष्टींकरता जबाबदार असते. बहुतेक यामुळेच मानवाने प्रथम देवत्व कल्पिले आणि उपासिले, ते स्त्रीरूपात - सर्जनाची गहनगूढ शक्ती धारण करणाऱ्या देवीरुपात. मातृदेवता ही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील “आद्या शक्ती” आहे. तिला मानवाने सर्वोपरी स्थान दिले, नाना रूपांत पाहिले, नाना नामांनी बाहिले आणि नाना रीतींनी पूजिले. आणि यामुळेच जगातील सर्व संस्कृतीमध्ये मातृदेवतेचे विशेष स्थान असल्याचे दिसून येते. जगातील सर्वात जुने मानले जाणारे शिल्प देखील मातृदेवतेचेच आहे. ‘व्हिनस’ ही रोमन संस्कृतीतील स्त्री देवता आहे, जिला मातृत्वाचे प्रतिक समजले जाते. जगामध्ये जेव्हां विविध उत्खानानांमध्ये मातृमूर्ती प्राप्त झाल्या, तेव्हां त्यांना ‘व्हिनस’ असे नामाभिधान दिले गेले. जगातील ज्ञात सर्वात प्राचीन मातृमूर्ती म्हणजे ‘व्हिनस ऑफ होह्ल फेल्स’ या मातृ देवतेच्या शिल्पाचा काळ हा जवळपास इ. स. पूर्व ३८ ते ४० हजार इतका जुना आहे. याशिवाय ‘व्हिनस ऑफ बेर्खात रॅम’ या शिल्पाचा काळ हा इ. स. पूर्व २,३३,००० इतका प्राचीन सांगितला जातो, परंतू इतिहासकारांमध्ये याविषयी मतभेद आहे. मात्र जगातील सर्वात प्राचीन शिल्प हे मातृदेवतेचेच आहे हे आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून येते. मेसोपोटेमिया, पॅलेस्टाईन, सिरिया, इजिप्त, बलुचिस्थान, बाल्कनराष्ट्रे, क्रीट, इराण, तुर्कस्तान इ. ठिकाणी मातृ देवतेच्या मूर्ती आढळून आलेल्या आहेत.
भारतीय संस्कृती ही पूर्वीपासूनच मातृसत्ताक असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांवरून दिसून येते. मातेला भारतीय संस्कृतीत नेहमीच श्रद्धेच्या व आराधनेच्या स्थानी मानले गेले आहे. भारतीय समाजामध्ये तिचा दर्जा हा पित्यापेक्षा नेहमी श्रेष्ठच समजला गेला आहे. भारतामध्येही मातृपूजनाची परंपरा ही अतिशय प्राचीन आहे. शक्ती उपासनेच्या वाड्मयरूपांचे दर्शन जेवढे गहनगूढ आहे, तेवढेच तिच्या मूर्तिरूपांचे दर्शनही आश्चर्यविमूढ बनविणारे आहे. भारतामध्ये मातृदेवतांची जी शिल्प प्राप्त होतात ती म्हणजे ताम्रपाषाण युगात इ. स. पूर्व २५०० ते इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या शिल्पांमध्ये बदल होत जातो. सिंधू संस्कृतीमध्ये विपुल प्रमाणात मातृमूर्ती प्राप्त झाल्या आहेत. यातील जवळपास मातृमूर्ती या मृत्तिकामूर्ती आहेत. म्हणजे भाजक्या मातीपासून निर्मित आहेत. या मूर्तींचे स्वरुप पाहिले तर असे दिसते कि, जवळपास मातृमूर्ती या नग्नावस्थेत आहेत. पूर्ण विकसित स्तन व जनेन्द्रीयाचे विशेष प्रदर्शन असल्याचे दिसते. त्याभोवती अलंकरण असल्याचेही दिसून येते. काही शिल्पात स्त्रीने बाळास कडेवर घेतलेले तर काही शिल्पात स्त्री बाळास स्तनपान करतानाचे अंकन आहे. या निरनिराळ्या मूर्तीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, प्राचीन काळापासून शक्तीची उपासना तीन प्रकारे केल्या जाते. एक म्हणजे दिगंबर(नग्न) मनुष्य रुपामध्ये, दुसरे म्हणजे लहान मुलासह आणि तिसरे रुप म्हणजे दिग्वसना स्त्री परंतू मुखाच्या ठिकाणी कमलासारखी फुले, पशु किंवा पक्षाचे तोंड असणे.
तिसऱ्या स्वरुपाचे उदाहरण म्हणजे ‘लज्जागौरीचे शिल्प’ याचे स्वरुप म्हणजे स्त्री ही नग्न स्वरुपात उत्कट अवस्थेत बसलेली दाखवतात. यामध्येही स्तन व जनेन्द्रीयाचे विशेष प्रदर्शन असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी स्त्री मुख तर विशेषतः मुखाच्या ठिकाणी कमळ पुष्पाचे अंकन असल्याचे दिसून येते. अशा स्वरूपाचे अंकन हरप्पा काळापासूनच दिसते. परंतू नंतरच्या काळात त्याचे स्वरुप आणखीन सुबक व व्यापक झाल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात ही लज्जागौरी दोन्ही हातात कमळ पुष्प धरलेली दाखवण्यास सुरवात झाली. मुळात लज्जागौरी हे नाव फार नंतर प्रचलित झाले. पौराणिक काळात या शिल्पांकनास कथेची जोड दिल्या गेली. व लज्जागौरी हे नाव प्रचलित झाले. सातवाहन काळतील प्रमुख शहरे असलेल्या पैठण व तेर या ठिकाणी लज्जागौरीच्या मातीच्या बऱ्याच लहान मूर्ती प्राप्त झालेल्या दिसून येतात.
याशिवाय मातृत्वाचे प्रदर्शन करणारे व मंदिरांवरील शिल्पांमध्ये प्रामुख्याने दिसणारे आणखी एक शिल्प म्हणजे ‘प्रसूतीशिल्प’ प्रसूती शिल्पाचे अंकनही जगातील विविध संस्कृतीमध्ये असल्याचे दिसते. बौद्ध धर्मात महामाया वृक्षाची फांदी पकडून उभी आहे अशा अवस्थेत बुद्धास जन्म देतानांचे शिल्पांकन विविध स्तुपांवर दिसून येते. हिंदु मंदिरांवर जी प्रसूती शिल्पे दिसून येतात त्यामध्ये स्त्री ही उभी किंवा उत्कट अवस्थेत असल्याचे दाखवतात, तिच्या जनेन्द्रीयातून बाळाचे डोके बाहेर आलेल्या स्वरुपात किंवा बाळ तिच्या हातात असल्याचे दाखवून ते नाळेने मातेशी जोडलेले आहे, अशा स्वरुपात अंकन असल्याचे प्रामुख्याने दिसून येते.
अशाप्रमाणे मातृदेवातेच्या या प्राथमिक मूर्तिस्वरूपानंतर पुढे भारतीय संस्कृतीत तिचे स्वरुप आणखीन व्यापक होत गेल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात अनेक भुजांनी आणि अनेक आयुधांनी नटलेल्या रूपात ती आपले परिणत मूर्तिस्वरूप दाखविते. या सर्व मूर्तिस्वरूपांमागे उपासकांच्या तिच्याविषयीच्या धारणांचे धागे गूढपणे गुंफले गेल्याचे दिसून येते. (हे धागे आपण पुढे हळूहळू उकलण्याचा प्रयत्न करूयात.)
यानुसार प्राचीन काळापासून मातृदेवातांचे अंकन होत असल्याचे आपणास दिसते. मातृमूर्ती या सहसा नग्न व जनेन्द्रीयाचे प्रदर्शन करतांना दाखवले जातात. या मूर्तींचे अशे स्वरुप बऱ्याच जणांना विचित्र किंवा अश्लील वाटते कारण ते यामागची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. शिल्प स्वरुपात दाखवतांना तिचे नग्न स्वरुप हे पावित्र्याचे आणि जीवन देणाऱ्या नैसर्गिक शक्तीचे प्रतिनिधित्व करते. स्त्रीचे जनेन्द्रीय हे सृजनतेचे व नवनिर्मितीचे प्रतिक आहे. याच धारणेमुळे भारतात पुढे योनीपूजा रूढ झाली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कामाख्यादेवीचे असलेल मंदिर होय. स्त्रीचे पूर्ण विकसित स्तन हे जीवनउपयोगी रसाचा स्त्रोत आहेत. कारण त्याद्वारेच स्त्री शिशुला स्तनपान देते. जे शिशूच्या संगोपनाकरिता अतिशय आवश्यक आहे. नवा जीव निर्माण करण्याची शक्ती ही केवळ नैसर्गिकरित्या स्त्रीकडेच आहे. आणि तिच्या या शक्तीची प्राचीन काळापासूनच आराधना केली गेल्याचे आपणास दिसून येते. आणि यामुळेच मातृदेवतेचे शिल्प हे स्त्री मधील असलेल्या मातृत्वाचे आणि सर्जन शक्तीचे प्रतिक म्हणून प्राचीन काळापासून संपूर्ण जगामध्ये पूजले जाते.
॥ मातृ देवो भव ॥
संदर्भ : १. Indian Mother Godess – N.N.Bhattacharya २. भारतीय मुर्तीशास्त्र – नी. पु. जोशी ३. लज्जागौरी – रा.ची. ढेरे
#शिल्पसाधना #shilpsadhana

